19.11.2026: राज्यपालांनी लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि दुष्काळ निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला
19.11.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा चाकूर येथे घेतला. जिल्ह्यातील दुष्काळाची सद्यस्थिती, पाणीटंचाई निवारण, चारा नियोजन, पीक नुकसान भरपाई आदी बाबींच्या माहितीचे यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. भूजल पुनर्भरणासाठी रिचार्ज शाफ्टची कामे हाती घेणे, पीक पद्धतीत बदल करणे आणि सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना राज्यपालांनी दिल्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन व प्रशासनाने समन्वयाने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहनही राज्यपालांनी केले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आदी यावेळी उपस्थित होते.