29.09.2026: राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते एकदिवसीय परिसंवादाचे उदघाटन
29.09.2026: आयुर्वेद ही भारताची प्राचीन आणि अमूल्य ज्ञानपरंपरा असून, या ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक संशोधन, क्लिनिकल चाचण्या आणि नवोन्मेषाची जोड देऊन आयुर्वेदाला जागतिक स्तरावर स्थान मिळवून द्यावे असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले. विश्व आयुर्वेद परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त एकदिवसीय परिसंवादाचे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते दादर मुंबई येथील सूर्यवंशी सभागृहात पार पडले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉ. मधुभाई कोठारी यांना जीवन गौरव पुरस्काराने, डॉ. स्वप्नील पदते यांना युवा धन्वन्तरी पुरस्काराने आणि मूलराज वडोर यांना आयुर्वेद उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विश्व आयुर्वेद परिषदेच्या स्मरणिकेचे तसेच डॉ विनायक तायडे यांच्या नाडी परीक्षण पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला आयुष विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उद्योजक रणजित पुराणिक, मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, विश्व आयुर्वेद परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनायक तायडे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ वेंकट गीते तसेच आयुर्वेद क्षेत्रातील वैद्य, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.